आतड्यातील जीवाणूंचा समतोल साधल्यास वाढते आयुष्य

वॉशिंग्टन : आतड्यातील जीवाणूंचा समतोल नीट साधला गेला तर माणसाचे आयुर्मान वाढू शकते, असे वैज्ञानिकांचे मत आहे. ‘बक इन्स्टिट्यूट फॉर रीसर्च ऑन एजिंग’ या अमेरिकी संस्थेच्या संशोधकांनी जीवाणूंवर हे संशोधन केले असून त्यामध्ये सिंबायोटिक प्रक्रियेवर नवीन प्रकाश टाकला आहे. यात आतड्याच्या शोषक पेशींचे अस्तर व जीवाणू यांच्यातील परस्पर संबंध उलगडला आहे. साध्या फळमाशीवर याबाबत प्रयोग करण्यात आला.

वृद्धत्वास कारण ठरणार्‍या जीवाणूंना निष्प्रभ केल्यास आरोग्यदायी जीवन जगता येईल, असे या संशोधनाचे मुख्य सूत्र आहे. प्रमुख संशोधक असलेले हेनरिच जॅसपर यांनी सांगितले की, काही जीवाणूंमुळे आतड्यावर विपरित परिणाम होऊन वृद्धत्वाच्या प्रक्रियेस वेग मिळतो. जीवाणूंमुळे आतड्यात जे बदल होतात त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण, दाह, प्रतिकार शक्तीत बिघाड व मूलपेशींची जास्त वाढ असे परिणाम होतात. आतड्यावर जे परिणाम होतात ते जीवाणूंच्या असमतोलामुळे, तर काहीवेळा अनुवंशिक कारणास्तव होतात. फळमाशीत वयपरत्वे आतड्यातील जीवाणूंचा भार वाढतो व त्यामुळे दाह निर्माण होतो. ‘एफओएक्सओ’ या ताणाशी संबंधित जनुकाच्या क्रियान्वयनामुळे असमतोल निर्माण होतो, त्यामुळे ‘पीजीएलवायआरपी’ या रेणूंची क्रिया मंदावते. परिणामी जीवाणूंचा प्रतिकारशक्ती यंत्रणा म्हणून प्रतिसाद कमी होतो. मुक्तकण हे आतड्यातील मूळपेशींची वाढ जास्त प्रमाणात करतात व त्याला कर्करोगापूर्वीची एपिथेलियल डिसप्लासिया असे नाव आहे. जॅसपर यांच्या मते जर पीजीआरपी-एससी नावाच्या रेणूंना कार्यान्वित केले तर आतड्यातील जीवाणूंचा समतोल साधला जाऊन मूलपेशींची अनिर्बंध वाढही रोखली जाते. औषधांच्या मदतीने या रेणूंची नक्कल करता आली तर फळमाशीचा आयुष्यकाल वाढवता येतो. ‘सेल’ नावाच्या नियतकालिकात शोधनिबंध प्रकाशित झाला.

2024-09-07T23:40:32Z dg43tfdfdgfd