आधी आईवर अतिप्रसंग, नंतर मुलीवर लैंगिक अत्याचार करुन गळा आवळला

दीपक जाधव, पणजी

पश्चिम बंगाल येथील एक कुटुंब रोजीरोटीसाठी मागील नऊ महिन्यांपासून वाडे-दाबोळी येथे आले होते. आई-वडील आणि एक साडेपाच वर्षांची चिमुरडी मुलगी असे हे छोटेखानी कुटुंब होते. मुलीचे वडील तिथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते आणि तिथे जवळच असलेल्या एका भाड्याच्या खोलीत हे कुटुंब राहत होते. राहते घर आणि वडिलांचे कामाचे ठिकाण जवळच असल्यामुळे मुलगी दिवसातून अनेकवेळा खेळत-खेळत आपल्या वडिलांकडे जायची.

असेच एकेदिवशी मुलीचे वडील रात्री कामावरून खोलीवर आले असता त्यांना घरात मुलगी दिसली नाही. त्यामुळे वडिलांनी मुलगी न दिसल्याने पत्नीकडे विचारणा केली. त्यावेळी ती तुमच्याकडे गेली असेल, असे आपल्याला वाटले, असे पत्नीने सांगताच काही तरी अभद्र घडल्याची शंका दोघा पती-पत्नीच्या मनाला चाटून गेली. त्यामुळे त्या दोघांनीही आजूबाजूच्या घरांमध्ये व परिसरात तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्रभर शोध घेऊनही मुलगीचा काही थांगपत्ता लागला नाही; पण पती-पत्नी रात्रभर आपल्या मुलीचा शोध घेतच राहिले होते.

दुसर्‍या दिवशी त्यांनी बांधकाम सुरू असलेल्या इमारत व परिसरात तिचा शोध घेतला असता ती बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत बेशुद्धावस्थेत आढळून आली. पालकांनी तिला तत्काळ चिखली उपजिल्हा इस्पितळात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच वैद्यकीय अधिकार्‍यांनी मुलीला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत, उपअधीक्षक संतोष देसाई, निरीक्षक कपिल नायक यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांचा तपास सुरू असतानाच मुलीच्या आईने मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला. त्यामुळे या तपासाची सर्व सूत्रे अधीक्षक सुनीता सावंत यांनी आपल्याकडे घेतली. त्यांनी या इमारतीवर काम करणार्‍या सर्व कामगारांची कसून चौकशी सुरू केली. मात्र, कोणतीही माहिती मिळाली नाही. त्याचवेळी मुलीचा वैद्यकीय अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. यात मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर अधीक्षक सावंत यांनी सर्व कामगारांची पुन्हा चौकशी सुरू केली. या चौकशीदरम्यान संशयित म्हणून मुरारी कुमार (वय 24) व उपनेश कुमार (22) या दोघांची नावे पुढे आली. पोलिसांनी लागलीच या दोघांना ताब्यात घेत त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. आरोपी मुरारी हा पेंटर, तर उपनेश हा गवंडी काम करतो. अटक करण्यात आलेले दोघेही संशयित कामगार मूळचे बिहारचे आहेत. ते कामानिमित्त वर्षभरापूर्वी गोव्यात आले होते.

घटनेच्या दिवशी दुपारी ही मुलगी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या परिसरात खेळत होती. त्याचवेळी या दोन नराधमांची वासनांध नजर तिच्यावर पडली. दोघांनीही तिला गोड बोलून, खाऊचे आमिष दाखवून अर्धवट बांधकाम झालेल्या एका इमारतीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. नंतर दोघांनी तिचा गळा आवळून तिचा खून केला आणि मृतदेह तिथेच टाकून पळ काढला होता; पण चोवीस तासांच्या आतच त्यांचे कुकर्म त्यांच्या समोर उभा ठाकले आणि त्यांची रवानगी कोठडीत झाली.

मुलीच्या आईवरही डोळा!

पोलिसांनी केलेल्या चौकशीत या नराधमांचा त्यापूर्वी मुलीच्या आईवरही डोळा असल्याची बाब समोर आली. संशयितांपैकी एकाने एका रात्री त्या मुलीच्या खोलीमध्ये शिरून तिच्या आईवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिने आरडाओरडा केल्यामुळे त्याने तिथून पळ काढला होता. यावेळी त्या कामगाराने मद्य प्राशन केले होते. याप्रकरणी त्या मुलीच्या आईने इमारतीच्या बांधकामाच्या सुपरवायझरकडे तक्रार केली होती. तपासादरम्यान पोलिसांना हाच महत्त्वाचा धागादोरा हाती लागल्याने पोलिसांनी त्या कामगारावर लक्ष केंद्रित करून सखोल चौकशी केली. त्यातूनच या अत्याचार व खुनाला वाचा फुटली.

2024-05-02T05:53:03Z dg43tfdfdgfd