जलालाबाद स्फोटातील खालिस्तानी अतिरेकी सूरतसिंहची संपत्ती जप्त

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Jalalabad Blast Case : जलालाबाद बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि पाकमधील खलिस्तानी अतिरेक्यांचा सहकारी सुरतसिंहची संपत्ती राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी जप्त केली. पंजाबमधील जलालाबाद येथे १५ सप्टेंबर २०२१ मध्ये एका दुचाकीत टिफीन बॉक्समध्ये पेरून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला होता. या प्रकरणात सुरतसिंहची महत्वपूर्ण भूमिका असल्याची माहिती एनआयएने दिली.

एनडीपीएस कायदा १९८५ च्या तरतुदीखाली सूरतसिंह याच्यासह खालिस्तानी अतिरेकी हबीब खान आणि लखवीर सिंहची संपत्ती जप्त करण्यात आली. जलालाबाद स्फोटातील आरोपी हबीब खान उर्फ डॉक्टर आणि लखबीरसिंह उर्फ रोडेने भारतात सुरतसिंह आणि इतर सहकाऱ्यांशी मिळून पंजाबमध्ये आयडी स्फोट घडवून आणला होता, असे एनआयएच्या चौकशीत आढळून आले आहे. (Jalalabad Blast Case)

या आरोपींनी अंमली पदार्थ तस्करी आणि दहशतवादी कारवाया करण्यासाठी अतिरेकी टोळी बनविली होती. या टोळीचा प्रमुख सुरतसिंह होता. पाकिस्तानातून अंमली पदार्थांच्या तस्करीसह स्फोटके, शस्त्रास्त्रे, बॉम्बसाठा आणण्याचे काम करीत होता, असेही एनआयएने स्पष्ट केले.

सुरतसिंहने अंमली पदार्थ तस्करी आणि दहशतवाद्यांचे रॅकेट चालवण्यासाठी बोगस आयकार्ड बनवून व्हर्च्युअल नंबर आणि व्हाट्सएपसारख्या एन्क्रिप्टेड संपर्क माध्यमांचा वापर केला. या टोळीने बॉम्बस्फोटापूर्वी फिरोजपुर शहरात एका मोटारीसह काही दुकानांमध्ये जाळपोळ केल्याचे एनआयएने म्हटले आहे. (Jalalabad Blast Case)

2024-04-19T14:38:48Z dg43tfdfdgfd