परीक्षेस हजर राहूनही गैरहजरचा शिक्का

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेच्या एका विद्यार्थ्याला पाचव्या सत्रातील ‘सिव्हिल प्रोसिजर कोड अॅन्ड लिमिटेशन अॅक्ट’ या विषयाच्या परीक्षेला हजर असूनही निकालपत्रावर गैरहजर दाखविण्यात आले आहे. तसेच परीक्षा केंद्रावरील हजेरीपत्रक आणि पर्यवेक्षकाची स्वाक्षरी असलेले प्रवेशपत्र विद्यापीठाकडे सादर केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला सुधारित निकालपत्रावर शून्य गुण देण्यात आले आहेत.

मुंबई विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत तृतीय वर्ष विधी शाखेची (तीन वर्षीय अभ्यासक्रम) पाचव्या सत्राची परीक्षा ही ५ ते १४ डिसेंबर या कालावधीत घेण्यात आली होती. तर ‘सिव्हिल प्रोसिजर कोड अॅन्ड लिमिटेशन अॅक्ट’ या विषयाची परीक्षा ५ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आली. या पाचव्या सत्र परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने २१ फेब्रुवारी २०२४ रोजी जाहीर करण्यात आला.

हेही वाचा : शिवाजी पार्कमधील माती काढण्यात अडचणींचा डोंगर

परंतु डॉ. सुनील जतानिया या विद्यार्थ्याला ‘सिव्हिल प्रोसिजर कोड अॅन्ड लिमिटेशन अॅक्ट’ या विषयात गैरहजर दाखविण्यात आले. त्यानंतर डॉ. जतानिया यांनी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे परीक्षा केंद्रावरील हजेरीपत्रक आणि पर्यवेक्षकाची स्वाक्षरी असलेले प्रवेशपत्र सादर केले. त्यानुसार २४ मार्च २०२४ रोजी सुधारित निकाल जाहीर करण्यात आला, या निकालात डॉ. जतानिया यांना संबंधित विषयात चक्क शून्य गुण दाखविण्यात आले. तसेच संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत प्राप्त करण्यासाठी व पुनर्मूल्यांकनासाठीही अर्ज केला आहे. मात्र अद्यापही उत्तरपत्रिकेची छायाप्रत प्राप्त झाली नसून पुनर्मूल्यांकन निकालाच्याही ते प्रतीक्षेत आहेत.

हेही वाचा : मैदान निसटू न देण्यासाठी मोदींच्या सभांवर सभा!

कागदपत्रे देऊनही तोडगा नाही

पत्रव्यवहार आणि संबंधित कागदपत्रे देऊनही तोडगा निघालेला नाही. मला गैरहजर दाखवून शून्य गुण देण्यात आले आहेत. मुंबई विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळू शकत नसल्याची प्रतिक्रिया डॉ. सुनील जतानिया यांनी दिली. तर विधी शाखेच्या विद्यार्थ्याच्या प्रकरणात मुंबई विद्यापीठ प्रशासन लक्ष घालत आहे. सर्व तांत्रिक बाजू तपासून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिली.

2024-04-25T04:47:59Z dg43tfdfdgfd