बाळासाहेबांचे झोपडपट्टीमुक्त मुंबईचे स्वप्न प्रत्यक्षात आणणार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईमध्ये ४० लाख झोपडपट्टीवासीयांना घरे देऊन झोपडपट्टीमुक्त मुंबईचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी विविध सरकारी संस्थांच्या माध्यमातून मुंबईसह एमएमआर क्षेत्रात ठिकाणी ५० लाख घरे बांधण्यात येतील, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी व्यक्त केला. घरांचा हा कोटा तयार होईल, तेव्हा घरांच्या आणि घरभाड्याच्या किमतीही आटोक्यात येतील, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.

गणेशोत्सवानिमित्त वर्षा निवासस्थानी पत्रकारांशी मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक वार्तालाप केला. ते म्हणाले, विक्रोळी,घाटकोपरमध्ये परवडणारी घरे उभारण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरात १७ हजार घरे एमएमआरडीएच्या माध्यमातून साकारली जात आहेत. यापूर्वी झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास हा एसआरएमार्फत केला जात होता. आता एमएमआरडीए, म्हाडा, एमआयडीसी, सिडको आदी शासकीय संस्थांना पुनर्विकासाच्या कामात उतरविले जात आहे.

ठाण्यामध्ये सिडकोच्या माध्यमातून क्लस्टर योजनेचे काम सुरू झाले आहे. रखडलेले एसआरए प्रकल्प हे रमाबाई आंबेडकरनगरच्या धर्तीवर शासकीय संस्थांना देऊन पूर्ण केले जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

2024-09-16T06:51:07Z dg43tfdfdgfd