भारतीय जवानाच्या भावाचे दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंग

श्रीनगर, वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमधील राजौरीत दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मोहम्मद रज्जाक यांचा मृत्यू झाला. ते कुंडा टोपे शाहदरा शरीफ येथील रहिवासी होते. गेल्या महिनाभरात जम्मू-काश्मीरमधील टार्गेट किलिंगची ही तिसरी घटना आहे.

रज्जाक यांचा भाऊ भारतीय लष्करात जवान आहे. भारतीय लष्करात भाऊ असल्याची आणि स्वत: भारत सरकारच्या सेवेत असल्याची किंमत रज्जाक यांना चुकवावी लागली. वीस वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी याच गावात रज्जाक यांचे वडील मोहम्मद अकबर यांची याच कारणाने हत्या केली होती. पित्यापाठोपाठ मुलगाही एका अर्थाने मातृभूमीसाठी शहीद झालेला आहे. मोहम्मद अकबर हे समाजकल्याण विभागात सेवेत होते. मोहम्मद अकबर यांच्यानंतर रज्जाक यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळालेली होती.

दहशतवाद्यांनी अमेरिकेत तयार झालेल्या एम 4 रायफलीसह एका पिस्तूलने रज्जाक यांच्यावर गोळ्या झाडल्या. पोलिसांनी एम 4 रायफलीच्या गोळ्या घटनास्थळावरून जप्त केल्या आहेत.

पोलिसांसह लष्करी अधिकार्‍यांनी राजौरीतील मंडी तालुका ठाण्याच्या हद्दीतील शाहदरा शरीफसह कुंदा गावात झडतीसत्र सुरू केलेले आहे. राजौरी जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पित्याला जेथे मारले, तेथेच मुलालाही मारले

रज्जाक यांच्या आईचा आक्रोश आसमंत भेदून टाकणारा होता. माझा मुलगा कामावरून आला, जेवला आणि जनावरांना चाराच घालत होता. तेवढ्यात बाहेर कुणीतरी हाक मारली. आम्ही बाहेर आलो. एकजण बंदुकीसह पुढ्यात होता. त्याने मुलावर गोळ्या झाडल्या. 20 वर्षांपूर्वी असेच माझ्या पतीसोबत घडले होते. मला न्याय हवा.

2024-04-24T02:01:17Z dg43tfdfdgfd