विखेंसाठी थोरातांना पहाटे झोपेतून उठविले होते, शरद पवारांनी सांगितला त्या लोकसभेचा किस्सा

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे नीलेश लंके यांच्यात लढत होत आहे. दोघांचाही प्रचार जोरात सुरू आहे. मात्र, प्रचारात राष्ट्रीय, राज्यपेक्षा स्थानिक मुद्देच अधिक चर्चेत आहेत. प्रचार विखे पाटील आणि लंके यांच्याभोवतीच फिरत आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोपप्रात्यारोप सुरू आहेत. शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली. त्यांनीही आपल्या भाषणात स्थानिक मुद्देच अधिक मांडले. एका निवडणुकीत दिवगंत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्यासाठी दिवंगत ज्येष्ठ नेते भाऊसाहेब थोरात यांच्या घरी पहाटे जाऊन भेट घेतल्याचा किस्साही पवार यांनी भाषणात सांगितला.

पवार म्हणाले, विखे पिता-पुत्र माझ्यावर व बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करतात, परंतु आम्ही दोघांनी बाळासाहेब विखे यांना मदत केली होती हे मात्र विसरतात. विखे परिवारात माणुसकी नाही. परंतु त्यांच्या परिवाराच्या सार्वजनिक जीवनात आमची काही ना काही मदत त्यांना नक्कीच झालेली आहे. पूर्वी एकदा बाळासाहेब विखे खासदारकीला उभे असताना मी त्यावेळी मुख्यमंत्री होतो. भाऊसाहेब थोरात मदत करतील अशी बाळासाहेब विखे यांना खात्री नव्हती. त्यावेळी मी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो. रात्री एक वाजेपर्यंत माझ्या बैठका सुरू होत्या. त्यानंतर हा प्रश्न माझ्यासमोर आला. त्यावेळी मी तातडीने बाळासाहेब विखे यांना माझ्या गाडीत बसवले व आम्ही जोर्वे (ता. संगमनेर) या थोरात यांच्या मूळ गावी गेलो. भाऊसाहेब थोरात यांची पहाटे तीन वाजता भेट घेतली. भाऊसाहेबांना आम्ही झोपेतून उठवले. त्यावेळी बाळासाहेब विखेंनी अंतकरणापूर्वक त्यांची माफी मागितली व थोरात यांनीही त्यांना माफ केले. पुढे विखे पाटील यांचा लोकसभेचा मार्ग खुला केला. तरीही विखे आमच्यावर टीका करतात याचा अर्थ त्यांच्यात माणुसकी नाही. ते आधी काँग्रेसमधून शिवसेनेत तेथून पुन्हा काँग्रेस विरोधी पक्षनेते, मग भाजप आणि तिथे मंत्री झाले. याचा अर्थ त्यांना स्वतःबद्दल आत्मविश्वास नाही, असेही पवार म्हणाले.

वाटोळे केलेल्या संस्थांची उत्तरे द्या -थोरात

याच सभेत बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री विखे यांच्यावर जोरदार टीका केली. मी एका पतसंस्थेला राजाश्रय दिल्याचा त्यांचा दावा असला तरी ते आता तुरुंगात बसले आहेत. चुकीचे काम करणाऱ्यांना आम्ही कधीही राजकीय आश्रय दिलेला नाही. मात्र तुम्ही गणेश कारखाना, राहुरी कारखाना व रावसाहेब पटवर्धन पतसंस्था यांचे वाटोळे केले, त्या प्रश्नांची उत्तरे आधी द्या, असे आव्हान थोरात यांनी विखे यांना दिले. तुमच्या दिवट्या चिरंजीवाने काय कर्तृत्व केले हे सांगावे लागू नये म्हणून शरद पवार व माझ्यावर टीका करून लक्ष दुसरीकडे वळण्याचे तुमचे प्रयत्न आहेत, असा दावाही थोरात यांनी केला.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-20T10:19:37Z dg43tfdfdgfd