'सुनेत्रा पवारांची दया येते, त्यांच्या पतीराजांनी..', राऊतांचा टोला! राणेंच्या 'चौकारा'चीही भविष्यवाणी

Loksabha Election 2024 Sanjay Raut About Supriya Sule Vs Sunetra Pawar: राज्यातील 11 मतदरासंघांमध्ये आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत असतानाच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्याला सुनेत्रा पवारांची दया येते असं म्हटलं आहे. सुप्रिया सुळेच बारामती जिंकणार असा विश्वास व्यक्त करताना संजय राऊत यांनी सुनेत्रा पवारांना त्यांच्या पतीकडून बळीचा बकरा बनवण्यात आल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. राऊत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेकडून चौथ्यांदा पराभूत होतील असं भाकित व्यक्त केलं आहे.

मी सांगतोय लिहून ठेवा...

"बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि अस्मितेची लढाई आहे असं मी अनेकदा म्हणालो आहे. बारामती आम्ही जिंकतोच आहोत. महाविकास आघाडीच्या सुप्रियाताई सुळे जिंकणार हे निश्चित आहे," असं उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनी म्हटलं आहे. "मी सांगतोय ते लिहून ठेवा, विक्रमी मतांनी सुप्रियाताई जिंकणार आहेत," असा दावा राऊत यांनी केला.

सुनेत्रा पवारांची दया येते

पुढे बोलताना संजय राऊत यांनी सुप्रियाताईंचं काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे असं म्हणत सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून एका गृहिणीला बळीचा बकरा बनवण्यात आल्याचा टोला लगावला. "सौ. सुनेत्रा पवार यांची मला दया येते. मला त्यांच्याविषयी वाईट वाटतंय. त्यांच्या पतीराजांनी त्यांना एका गृहिणीला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न केला," असा टोला संजय राऊत यांनी लगावला. 

भाजपाचे अनेक उमेदवार पराभवाच्या छायेत

राऊत यांनी महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये भाजपा उमेदवार पराभवाच्या छायेत आहेत असं म्हटलं आहे. "महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये भाजपा दारुण पराभवाच्या छायेत आहेत. भाजपाचे महाराष्ट्रातील अनेक विद्यमान खासदार हे यावेळेला लोकसभेत दिसणार नाही. हे महाराष्ट्राच्या जनतेचे ठरवले आहे," असं राऊत म्हणाले.

नारायण राणेंच्या पराभवाचा चौकार

नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी चुरशीची लढाई सिंधुदुर्गमध्ये आहे असं म्हणत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळेस त्यांनी, "नारायण राणेंच्या पराभवाचा चौकार मारला जाणार आहे. तीन वेळा आम्ही त्यांचा पराभव केला आहे. कोकणातही केला आणि मुंबईतही पराभव केला. आता ते लोकसभेच्या मोठ्या मैदानात उतरलेत. या कुस्तीतसुद्धा त्यांना चितपट केलं जाईल. विनायक राऊत पुन्हा लोकसभेत जातील," असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

2024-05-07T05:05:39Z dg43tfdfdgfd