सोलापुरात भाजपच्या पाठीशी हिंदुत्ववादी संघटना

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी विजयासाठी मोदीत्व आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर भर दिला असून त्यांच्या पाठीशी संघ परिवाराशी संबंधित हिंदुत्ववादी संघटनाही उभ्या राहिल्या आहेत.

एका मेळाव्यात सातपुते यांना समर्थन देताना हिंदुत्ववादी संघटनांनी, ज्यांनी राम मंदिर बांधले, आम्ही त्यांनाच निवडून आणू, असा निर्धार केला गेला. तर सातपुते यांनी नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी मशिदींमधून फतवे काढले जात असल्याचा पुनरूच्चार करीत, यासंदर्भात आपण स्वतः निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा – सोलापूरचे भाजपचे दोन्ही खासदार सतत दहा वर्षे नापासच, प्रणिती शिंदे यांची टीका

जुन्या एम्लॉयमेंट चौकाजवळील शांतीसागर मंगल कार्यालयात आयोजित हिंदुत्ववादी संघटनांच्या मेळाव्यात भाजपचे उमेदवार सातपुते उपस्थित होते. यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी मंगल कार्यालय दुमदुमून गेले होते. गळ्यात भगवे उपरणे आणि डोक्यावर भगव्या टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते उपस्थित होते. यात गोरक्षक संघटना, बजरंग दलासह अन्य संघटनांनी पुढाकार घेतला होता.

हेही वाचा – महाराष्ट्रात दुष्काळात चारा पाठविला म्हणून ‘अमूल’वर मोदींनी भरला होता खटला, शरद पवार यांचा आरोप

सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात आयोजित प्रचार सभांमध्ये आमदार विजय देशमुख यांनीही हिंदुत्वाचा राग आळवला. ही लोकसभा निवडणूक असल्यामुळे देश आणि धर्म दोन्ही महत्वाचे आहेत. धर्म, देव आणि देशाचे हित पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

2024-04-26T15:55:11Z dg43tfdfdgfd