मोदी पर्व समजून घेताना...

संतोष डिंगणकर

नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते, तेव्हा मी चारदा गुजरातमधील निवडणुकांचे सर्वेक्षण केले होते. या कालावधीत तीन ते चार वेळा त्यांच्याशी माझ्या छोटेखानी भेटी झाल्या होत्या. पहिल्याच भेटीत मी त्यांना म्हणालो होतो की, तुमचे भाषण ऐकताना मला बाळासाहेब ठाकरे यांची आठवण होते. बाळासाहेब भाषणादरम्यान जसे जनतेशी संवाद साधायचे, तसेच मोदींचे भाषण असायचे. अगदी आजही भाषणात ते जनतेशी संवाद साधताना दिसतात.

गुजरातचे मुख्यमंत्री असताना स्थानिक माध्यमे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सूर काढत असत. याबद्दल विचारले असता मोदी म्हणाले होते की, माध्यमे नेहमीच माझ्याबद्दल वाईट बोलतात, लिहितात. मला शिवीगाळही करतात. एवढेच नव्हे तर मला खलनायकही ठरवितात. मग मी नेमका कसा आहे हे पाहण्यासाठी माझ्याकडे येतात…माझी बाजू ऐकतात…आणि नंतर माझेच होऊन जातात. त्यामुळे त्यांच्याकडे मी लक्ष न देता मी माझे काम सुरू ठेवतो. लोकांना माझे काम समजते आणि आवडते.

मोदी हे आजदेखील तसेच वागतात. टीकेकडे लक्ष न देता काम करण्याला सर्वाधिक महत्त्व देतात. माध्यमांचा विरोध हा आर्थिक गणितांशी संबंधित असतो, असे तेव्हा मला काही माध्यमकर्मींनी सांगितले होते. मोदी यांनी जे जे काम हाती घेतले, ते ते काम दूरद़ृष्टी ठेवून केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी जनतेत राहून काम केले. संपूर्ण देशभरात ते यादरम्यान पक्ष कार्यासाठी फिरले. विशेष म्हणजे कोणतीही निवडणूक न लढविता पक्षाने त्यांना थेट मुख्यमंत्री म्हणून निवडले. त्या पदावर मांड ठोकून त्यांची राजकीय कारकीर्द बहरत गेली आणि त्यांनी थेट पंतप्रधानपदाला त्यांनी गवसणी घातली. प्रशासनावर मजबूत पकड ही मोदी यांची खासियत होय. अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांनी मला सांगितले होते की, प्रत्येक कामाचा पाठपुरावा करण्याची मोदी यांची हातोडी वेगळीच होती. सकाळी सातपासूनच आम्ही दक्ष असायचो. कारण, त्यांचा फोन कधी येईल याचा कोणताही नेम नव्हता. याचे कारण, म्हणजे काम कोणतेही असले तरी ते ठरलेल्या वेळेत आणि कोणताही अडथळा न येता पूर्ण करण्याबद्दल त्यांची असलेली तळमळ. त्यांच्या दूरदृष्टीतूनच गुजरातचा कायापालट झाला. गुजरात मॉडेल (प्रारुप) म्हणून त्यांची केवळ देशातच नव्हे, तर जागतिक पातळीवरही वाहव्वा झाली.

एका ईमेलनंतर लगेच कार्यवाही

नंदुरबार येथील काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचा गुजरातमध्ये कारखाना आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे त्या परिसराचे प्रचंड नुकसान झाले होते. त्या नेत्याने याची माहिती मोदी यांना ईमेलद्वारे कळवली. मग पंधरा दिवसांनी मोदी यांनी त्या नेत्याला कळविले की, नुकसान झालेल्या भागाचा पूर्णपणे कायापालट झाला आहे. यानंतर तो नेता म्हणाला, एखाद्या कामाबाबत एवढी तत्परता यापूर्वी मी कधीच अनुभवली नव्हती. आजही मोदी तसेच वागतात. काम कोणतेही असले तरी त्याचा सगळा साद्यंत तपशील ते लक्षात ठेवून त्यानुसार पुढील कार्यवाही वेगाने करतात. त्यात काही अडचणी आल्या तर त्या कशा दूर करायच्या याबद्दल संबंधित कर्मचार्‍यांना मार्गदर्शनही करतात. हीच त्यांच्या कामाची खासियत आहे.

मोदींबद्दल आदराची भावना

विरोधकांशी मोदी आकसाने वागतात, असा आरोप अधूनमधून होताना दिसतो. वस्तुस्थिती मात्र सर्वस्वी वेगळी आहे. कारण, मोदी यांच्या अनेक कट्टर विरोधकांशी मी बोललो आहे. त्यांचा विरोध केवळ विचारसरणीशी संबंधित आहे. विशेष म्हणजे त्यातील एकानेही मोदी भ्रष्टाचारी असल्याची कोणतीही शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली. मोदी यांचे हेच बलस्थान आहे. त्यामुळे आजही सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार आदी नेत्यांना मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप करता येत नाही. मोदी यांच्याविरोधात बोलताना त्यांची कोंडी होताना दिसते.

2024-04-26T04:13:56Z dg43tfdfdgfd